बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवरील टीका करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलंच ...
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात खालच्या पातळीवरील टीका करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलंच भोवलं आहे. पडळकर यांच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल बारामती शहर पोलिसांना गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते. आज पडळकर यांच्याविरोधात निदर्शने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पडळकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली असून पडळकर यांच्याविरोधात ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधी 'जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या मांडणार', असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यामुळे अखेर पोलिसांकडून पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पडळकर यांनी पवारांविरोधातील केलेलं विधान हे द्वेषपूर्ण असून जातीय आणि प्रादेशिक तेढ निर्माण करणारं आहे. त्यांचं विधान खोटं आणि आक्षेपार्ह असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज बारामतीसह औरंगाबाद, मनमाड, सोलापूर, ठाणे आणि मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने करत पडळकर यांचा निषेध नोंदवण्यात आला. सोलापुरात तर गाढवाच्या चेहऱ्यावर गोपीचंद पडळकरांची प्रतिमा लावून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर काही ठिकाणी त्यांचे पुतळे जाळूनही निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत