मुंबई : वेबटीम एखाद्या लग्न सोहळ्यात मांडवपरातनी वरून रुसणाऱ्या जावयागत सत्तेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी वारंवार छोट्या छोट्या गोष्ट...
मुंबई : वेबटीम
- एखाद्या लग्न सोहळ्यात मांडवपरातनी वरून रुसणाऱ्या जावयागत सत्तेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी वारंवार छोट्या छोट्या गोष्टींसाठी फुगत आहे, तर बिचारे मुख्यमंत्री पोरगी नांदवावी तसं हे सरकार गुण्यागोविंदाने नांदावे, म्हणून नेहमीच विनम्रतेने या दोघांची समजूत काढताना दिसत आहे. मात्र, या दोन राजकीय जावयाच्या सततच्या त्रासाला वैतागलेले मुख्यमंत्री अचानक घटस्फोटापर्यंत गेल्यास नवल वाटणार नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री अशोक चव्हाण रुसले होते, त्यामुळे काँग्रेसची कुरकुरणारी खाट मुख्यमंत्र्यांनी कुठं शांत केली नाही तोच, पुन्हा राष्ट्रवादीचे दुखणे कानावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढवताना विश्वासात न घेतल्याची भावना आता राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. आधी निर्णय प्रक्रियेत काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची तशी भावना झाल्याने, महाविकास आघाडीतील कुरबुरी वाढल्याचं चित्र आहे. दरम्यान, सरकारने महाराष्ट्रात अनलॉकिंग करताना, जे निर्बंध घातले होते ते 31 जुलैपर्यंत कायम ठेवले. मात्र हा निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दूरध्वनीवर संवाद झाला. लवकरच पवार-ठाकरे या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला सत्तेत येऊन आता जवळपास सात महिने झाले आहेत. मात्र यादरम्यान महाविकास आघाडीतील कुरबुरीच्या काही घटना समोर येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन आपण या गोष्टीना वैतागलो असून आता निर्णयापर्यंत आल्याचेही सांगणार असल्याचे बोलले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत