देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि.२७ जानेवारी २०२२ रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मरा...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
देवळाली प्रवरा येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि.२७ जानेवारी २०२२ रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानासाठी न्यू आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज पारनेर येथील प्रा.डॉ. हरेश शेळके हे व्याख्याते म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. स्वाती हापसे या होत्या.
भाषा बोलता आली म्हणजे आपण परिपूर्ण झालो असे नसून व्यक्तिमत्व आणि वर्तमान काळातील होणारे बदल स्वीकार करणे म्हणजे भाषा शिकणे किंवा अर्जित करणे होय. या व्यक्तिमत्वातील व बाह्य बदलातूनच आपल्याला रोजगाराच्या अनेक संधी शोधता येतात, जागतिकीकरणाच्या या कालखंडात मातृभाषा आणि आजच्या युवा पिढीचा संबंध जो दुरावत चालला आहे, तो भाषाविषयक जागृती आणि जीवन जाणिवांचे जतन केल्यानेच दूर होईल. २१व्या शतकात सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषा-भाषांमधील संबंध दुरावत चालले आहेत, ते मातृभाषेद्वारेच अनुवाद आणि इतर साहित्यविषयक कार्यांनी कमी करता येवू शकतात. त्यातूनच आपल्याला समकालाशी व्यवस्थित जोडून घेता येईल व तंत्रज्ञानाच्या आधुनिक साधनांद्वारे रोजगाराच्या अनेक संधी आपल्याला निर्माण करता येतील. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहेच, मात्र भविष्यात आपापली क्षेत्रे निवडून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मराठी भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे प्रतिपादन डॉ.हरेश शेळके यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्या हापसे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वाचन आणि लेखन कौशल्य विकसित केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात एक चांगला नागरिक म्हणून तो उभा राहू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जी काही चांगली कौशल्ये आहेत ती आत्मसात केली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. राजू साळवे, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. बाळासाहेब फुलमाळी, प्रा. सतीश कटके, प्रा.डॉ. बापूसाहेब खिलारी, प्रा. रागिणी टेकाळे-कदम, प्रा. प्रकाश रोकडे, प्रा. दादा बंडगर, प्रा.संतोष गुंड, प्रा.महेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन प्रा. बाळासाहेब फुलमाळी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत