कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिका निधी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये जिल्हा बँकेचे सं...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपालिका निधी अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रभाग क्रमांक पाच व सहा मध्ये जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे जळफळाट होऊन सैरभैर झालेल्या विरोधकांनी टीकेचा संकुचितपणा दाखवला. राष्ट्रवादीचे बाळासाहेब रुईकर यांनी लहान तोंडी मोठा घास घेत विवेकभैय्या कोल्हे यांच्यावर २८ कामांच्या न्यायालयीन लढाईचा धागा धरत नैतिक अधिकारावर टिप्पणी केली. त्यावर रुईकर यांना उत्तर देतांना युवासेना उपशहरप्रमुख श्री.आशिष निकुंभ यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
विद्यमान आमदार शहरात जी उद्घाटने करत फिरत आहेत त्यात त्यांचा तर दुरान्वये संबंध नाही कारण ती कामे शिवसेना भाजपा नगरसेवकांनी बहुमताने ठराव करून निधी मिळवलेली कामे आहेत. त्यावर आयता डल्ला मारून प्रसिध्दीची हौस विद्यमान आमदार भागवत असून याउलट माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात भरघोस निधी मंजूर झाला व त्यांनी भरीव कामे शहरासाठी आणली. तसे एकही ठोस काम विद्यमान आमदारांना करता आले नसल्याने ज्यांना प्रभाग पाच मधील नागरिकांनी तीन तीन वेळा नाकारले आहे, अशांचा आधार घेऊन टीका करावी लागत आहे असा घणाघात श्री.आशिष निकुंभ यांनी केला आहे.
प्रभाग ६ बोरा घर ते मनोज अग्रवाल घर विद्यमान आमदारांनी उद्घाटन केले व त्यांनीच नेमलेल्या ठेकेदाराने केलेला रस्ता तयार होत नाही तोच उखडला असून नागरिकांनी त्या निकृष्ट कामाची चिरफाड केली असून समाजमाध्यमावर टीकेची झोड उठवली आहे. त्यापासून तोंड लपवण्यासाठी दुसऱ्यांवर चिखलफेक करणे हा प्रकार सुरू आहे.
२८ कामांबद्दल अज्ञान मांडणारे विरोधक आजही हे मान्य करणार नाही की भाजपा शिवसेना नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शहराचे २-३ कोटी रुपये वाचले असून त्यातून इतर कामे मार्गी लागणार आहेत. वस्तुस्थिती कळत असून झोपेचे सोंग घेणारे विरोधक हे अस्वस्थ झाले असून हाती काही लागत नाही म्हणून बेछूट आरोप करण्यात त्यांना रस आहे. भाजपा व शिवसेना नगरसेवक हे विकासासाठीच भांडत आले त्यातून सत्य जनतेसमोर आले त्यामुळे विरोधकांचा तोल जात असून बुंद से गयी हौद से नहीं आती हे समजून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण रुईकर यांच्या सारखे प्रभागात शून्य योगदान व अपयशी असलेल्या व्यक्तींच्या नावाने टीका करण्याचा अनास्था प्रसंग काळे गटावर ओढवला आहे. २८ कामे आम्ही चांगली व्हावी यासाठीच मंजूर केली आहेत त्याचा त्रास विरोधकांनी करून घेऊ नये असे प्रतिपादन श्री. निकुंभ यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत