कोपरगाव प्रतिनिधी :- मागील पाच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत असतांना व सर्व समित्यांचे सभापती त्यांच्या पक्षाचे असतांना देखील कोपरगाव शह...
कोपरगाव प्रतिनिधी :-
मागील पाच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत असतांना व सर्व समित्यांचे सभापती त्यांच्या पक्षाचे असतांना देखील कोपरगाव शहरात एकही ठोस विकास काम झालेले नाही. ज्यावेळी विकास कामांना मंजुरी देण्यात आली त्यावेळी त्यांनी आपल्या नगरसेवकांना या कामांना स्थगिती मिळविण्यासाठी न्यायालयात पाठविले. त्यांना कोपरगाव शहरातील विकास कामांचे उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा तिखट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब रुईकर यांनी विरोधकांना केला आहे.
सत्ताधारी विरोधकांकडे विकासाची मानसिकता नसल्यामुळे मागील पाच वर्ष त्यांनी गोंधळ घालण्यातच घालविlल्यामुळे विकासाचा खेळखंडोबा झाला.जीवघेण्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोटा-मोठा व्यापारी वर्ग अगोदरच अडचणीत सापडला होता. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून शहरविकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांसह विकास कामे झाल्यास बाजारपेठ फुलण्यास मदत होणार होती. मात्र या विकासकामांना न्यायालयात जावून स्थगिती आणण्यात आली. त्यामुळे कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत खूपच मागे पडले व त्याचा विपरीत परिणाम कोपरगावच्या बाजारपेठेवर झाला. त्यांच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे मागील पाच वर्षात प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. यातील एक नगरसेवकाने नगराध्यक्षपदावर तर दुसऱ्या नगरसेवकाने उपनगराध्यक्षपदावर काम केलेले आहे.मागील वीस वर्षापासून हे या प्रभागातील नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. मात्र आजही प्रभागातील गटारी आणि रस्त्याचे प्रश्न जैसे थे असून नगरसेवकपद गेल्यानंतर विकासकामांचे उद्घाटन होत आहे यावरून त्यांची निष्क्रियता दिसून येते.
शहरातील नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागला. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले याची नैतिक जबाबदारी ज्यांनी आपल्या नगरसेवकांना विकासकामांना न्यायालयात जावून स्थगिती आणायला सांगितली त्यांची नाही का? असा सवाल देखील रुईकर यांनी केला आहे. तुम्हाला विकास कामांची उद्घाटने करायची होती तर शहरातील नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे जवळपास एक वर्षापूर्वीच ज्या वेळी विकास कामांना मंजुरी देण्यात आली त्याच वेळी उद्घाटने झाली असती तर नक्कीच नागरिकांना दिलासा मिळाला असता. मात्र तुम्हाला नागरिकांना विकासापासून वंचित ठेवायचे होते त्यामुळे तुम्ही विकास कामांना न्यायालयात जावून स्थगिती आणली होती का? तुम्ही अजूनही विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरले नाहीत का? असे अनेक सवाल बाळासाहेब रुईकर यांनी विरोधकांना करून कोपरगाव शहरातील विकास कामांचे उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा तिखट सवाल देखील विचारला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत