राहुरी(वेबटीम) तालुक्यातील टाकळीमिया येथील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या जलस्वराज्य टप्पा - 2 या 9 कोटी 27 ला...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील टाकळीमिया येथील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या जलस्वराज्य टप्पा - 2 या 9 कोटी 27 लाखाच्या पाणीपुरवठा योजनेला आता सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जल संजीवनी मिळाली आहे. अत्यंत सदोष असलेल्या या योजनेमुळे गेली दोन वर्ष ग्रामस्थांना पिण्याचे थेंबभरही शुद्ध पाणी मिळाले नाही. या योजनेतून आलेल्या दुषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. मात्र बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशार्याने आणि सततच्या पत्रव्यवहाराने या योजनेला पुन्हा चालना मिळाली आहे. आता या योजनेसाठी तपासणी व दुरूस्ती अंती 5 कोटी 23 लाख 63 हजार रूपयांची शासकीय अध्यादेशान्वये दि. 5 डिसेंबर 2022 रोजी तांत्रिक मान्यता तसेच दि. 13 डिसेंबर 2022 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून या महत्वाकांक्षी रेट्रो फिटींग योजनेचा समावेश असलेल्या माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.आर. वारे यांनी दिली.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी तांत्रिक मान्यता दिलेल्या. या योजनेतून आता टाकळीमिया ग्रामस्थांना शुद्ध आणि पुरेशा क्षमतेने पाणी मिळणार आहे.
टाकळीमिया ग्रामस्थांच्या दृष्टीने ही पाणी योजना अत्यंत महत्वाकांक्षी आहे. या योजनेला दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी प्रारंभ झाला. दि. 31 मे 2020 रोजी ही योजना ठेकेदाराच्या दृष्टीने कागदोपत्रीच पूर्ण झाली. मात्र त्यातून अशुद्ध व दुषित पाणी आणि सदोष जल वाहिन्यांच्या वितरणामुळे ही कोट्यवधी रूपयांची पाणी योजना ग्रामस्थांच्या दृष्टीने कुचकामी ठरली. याबाबत बाळासाहेब जाधव यांनी अनेकदा संबंधित अधिकार्यांकडे तक्रारी केल्या. मात्र ठेकेदाराला पाठीशी घालणार्या आडमुठ्या अधिकार्यांनी तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केले. ही योजना सपशेल अपयशी ठरलेली असतानाच बाळासाहेब जाधव यांनी मंत्रालय शासन स्तरावर पाठपुरावा करून, उपोषणाची तंबी देत कागदोपत्रीच्या रेट्याने अधिकारी आणि ठेकेदाराची पळताभुई थोडी केली. संबंधित ठेकदाराने या योजनेत अत्यंत सदोष आणि निकृष्ट दर्जाचे कामे केली असल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर जाधव यांच्या इशार्याने अधिकारी आणि ठेकेदाराने नरमाईची भूमिका घेऊन पुन्हा योजनेच्या घटनास्थळी येऊन पाहणी केली.
या योजनेतील त्रुटी जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर जाधव व ग्रामस्थांच्या योजनेविषयी मागण्या मान्य करून काम पुन्हा रिटेंडरींग करण्याची हमी दिली.
प्रारंभी या योजनेसाठी 9 कोटी 27 लाखांचा आर्थिक आराखाडा तयार करण्यात आला होता. मात्र या सदोष योजनेतील सुधारणेसाठी 5 कोटी 23 लाख 63 हजार 732 रूपयांच्या निधीला पुन्हा नव्याने मान्यता देण्यात आली आहे. तसा प्रशासकीय मान्यता देऊन शासकीय अध्यादेशही पारीत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात या योजनेतून ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाल नाही. त्यामुळे शासनाचे 9 कोटी 27 लाख रूपये सपशेल पाण्यात गेले आहेत. याबाबत बाळासाहेब जाधव हे संबंधित ठेकेदार व प्रशासना विरोधात आक्रमक भूमिका घेणार असून संबंधित बेजबादार अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
टाकळीमिया गावासाठी ही अत्यंत महत्वांकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे माझ्या माता-भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरून हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी मायपीट बंद होणार आहे. या योजनेतून अबंधित राहणार आहे. त्यामुळे या योजनेद्वारे शेवटच्या घटकापर्यंत पिण्याचे पुरेसे शुद्ध पाणी मिळावे यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून या योजनेच्या अस्तित्वासाठी मी सरकार दरबारी संघर्ष केला. त्यात सुभाष करपे, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, माजी सरपंच ज्ञानदेव निमसे, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव निमसे, सुभाष जुंदरे, बाळासाहेब शिंदे,बाबासाहेब शिंदे, किशोर मोरे, मधुकर सगळगिळे, राजाबापु सगळगिळे, विष्णु कवाणे यांच्यासह ग्रामस्थांनी लोक सहभाग दिला. त्यामुळे आता योजनेच्या पूर्णत्वाला यश येणार आहे. यासाठी आता यापुढेही संघर्ष चालू राहणार आहे.
या योजनेतील उद्भवातून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी 30 अश्वशक्तीची विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत. दरम्यान टाकळीमिया ग्रामस्थांना विजेविना पिण्याच्या पाण्याचा 24 तास वीज पुरवठा होण्यासाठी सौर उर्जेमुळे विजेचा खर्च वाचणार आहे. चर्मकार वस्ती येथे 75 हजार लिटरचा जलकुंभ, कारवाडी येथे 30 हजार लिटरचा जलकुंभ बसविण्यात येणार आहे. यात विहिरीचे खोलीकरण करण्यात येणार असल्याने जलसाठवण क्षमतेत वाढ होणार असून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पपिंग मशिनरी बसविण्यात येणार असल्याने ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा अडथळा दूर होणार आहे. गावांतील संपूर्ण वाड्यावस्त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. गावातील अन्य पाईप लाईन दुरूस्तीही करण्यात येणार आहे. अशी माहिती बाळासाहेब जाधव यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत