राहुरी/वेबटीम:-- राहुरी तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांचा प्रश्न आम्हीच सोडविणार असून ज्यांनी चाळीस वर्षांत ३ वेळा उदघाटन केले, शेतक...
राहुरी/वेबटीम:--
राहुरी तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांचा प्रश्न आम्हीच सोडविणार असून ज्यांनी चाळीस वर्षांत ३ वेळा उदघाटन केले, शेतकऱ्यांना झुलवत ठेवले त्यांनी आत्मपरीक्षण करावे. अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात राहुरी ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय इमारत हे प्रश्न त्यांना सोडवता आले नाही. विशेष म्हणजे ज्यांना ऊर्जा खाते सांभाळता आले नाही. तेच आता रस्त्यावर उतरून आंदोलनाचा दिखावा करत असल्याची टिका खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.
राहुरी तालुक्यातील तांभेरे, कानडगाव, वडनेर, कणगर, चिंचविहिरे आदी गावांमध्ये खा.डॉ. सुजय विखे पाटील व माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते विकास कामांची सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते.
खा.डॉ.विखे यांनी यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राहुरीला सत्तेत स्थान होते. परंतु त्याचा वापर करून अवैध धंदे, वाळू तस्करी यांना अभय दिले गेले. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला. यापूर्वी आमच्याकडे सत्ता आली गेली, मंत्री पद होते, आहे परंतु आम्ही चुकीचे उद्योग कधी केले नाही. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत लस उपलब्ध करून दिली. पात्र लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळत आहे. शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठी उपलब्धता आहे. राहुरी मतदार संघात माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक विकासाचे कामे केली. विशेषतः जिरायत भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले परंतु त्यांचा पराभव झाला ही खंत आहे. परंतु आता आपल्या सर्वांना त्यांना आमदार करायचे आहे. महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिसराचा कायापालट होत आहे असे त्यांनी सांगितले.
माजी आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही मंजूर केलेल्या अनेक कामांना स्थगिती दिली होती. व पुन्हा तेच कामे त्यांनी केली याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. निळवंडे धरण कालवा, कानडगाव वीज उपकेंद्र, ब्राम्हणी व राहुरीची पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते आदी कामे आमचीच असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, सोपान गागरे, मधुकर गागरे, विलास मुसमाडे, विश्वासराव कडू, उत्तमराव मुसमाडे, डॉ बापूसाहेब मुसमाडे, जालिंदर बेलकर, आणासाहेब बलमे, सर्जेराव घाडगे, सरपंच लताबाई बलमे, संदीप घाडगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे धर्मांतर प्रकरणाबाबत झालेल्या घटनेत कोण योग्य किंवा अयोग्य हे आपल्याला माहिती नाही. आपण सर्व जाती धर्माचे लोक जातीय सलोखा कायम ठेवून एकत्र राहतो. प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर केला पाहिजे परंतु यापुढे जर कोणी असा प्रकार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर गावोगावच्या युवकांनी पुढे येऊन यास विरोध करावा नाही तर मला फोन करा मी बंदोबस्त करील असे खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.)
(राहुरी तालुक्यातील निळवंडे धरण कालव्यांचे काम खुल्या पध्दतीने करावे या शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात २१ गावातील ग्रामपंचायतीनी ठराव दिलेले आहेत. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना.देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, आपण व संबंधित गावांतील पाच ते दहा नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय होण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत असे माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत