राहुरी (वेबटीम):- सायं.दै. सार्वमंथन वृत्तपत्राचे उपसंपादक सागर दोंदे हे कार्यालयीन कामकाज पार पाडून घराच्या दिशेने जात असताना राहुरी-ताहारा...
राहुरी (वेबटीम):-
सायं.दै. सार्वमंथन वृत्तपत्राचे उपसंपादक सागर दोंदे हे कार्यालयीन कामकाज पार पाडून घराच्या दिशेने जात असताना राहुरी-ताहाराबाद रस्त्यावर दोन अज्ञात व्यक्तीने गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना काल २४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यानुसार दोन अज्ञात व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सागर माधव दोंदे (वय ३१, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोंदे कार्यालयीन कामकाज आवरुन स्वतःच्या दुचाकीवरून (एमएच १७, बिक्यु २९१९) राहुरीहून म्हैसगावकडे जात असताना सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास ताहाराबाद रस्त्यावरील सटुआई मंदीराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून ते म्हणाले की, कारे तु माजला का. तुझी लायकी काय, तु तुझ्या लायकीत राहा, असे म्हणुन त्यांची गचांडी पकडुन धक्काबुक्की केली आणि आमच्या नादाला लागु नकोस, नाहीतर तुला माझ्या हातात असलेल्या चाकुने भोकसुन जिवे ठार मारीन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यांनतर ते दोघेही दुचाकीवरून पसार झाले.
सागर दोंदे यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 341, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव
सागर दोंदे यांनी सहकारी मित्रांना संपर्क करून घडलेला प्रकार कथन केला. त्याच दरम्यान एका सहकाऱ्यानी राहुरी पोलिसांना संपर्क करून घटनास्थळी धाव घेण्यास सांगितले. काही तासांतच मित्र परिवार व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना धीर दिला.
पत्रकारांचा आवाज दाबला जातोय
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमाकडे पाहिले जाते. मात्र सद्यस्थितीला कोणतेही माध्यमं सुरक्षित राहिलेले नाहीत. अनेक पत्रकार बांधव सामाजिक, राजकीय विषयांना वाचा फोडतात. मात्र त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पत्रकारिता करत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने वृत्तपत्रात काम करायचे कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत