आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील केसापूर परिसरात उच्छाद मांडून वाटसरूंवर हल्ले करणारी बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास अखेर वन विभागा...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील केसापूर परिसरात उच्छाद मांडून वाटसरूंवर हल्ले करणारी बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद करण्यास अखेर वन विभागाला यश आल्याने केसापूर सह आंबी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रविवारी (दि. १५) दुपारी चार वाजता केसापूर-केशव गोविंद बन रस्तावर केळीच्या बागेजवळ वन विभागांत पिंजरा लावला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास त्यात बिबट्या मादी शिकारीच्या शोधात निघाली असता अलगद अडकली. या बिबट्याने केसापूर परिसरात मोठा उच्छाद मांडला होता. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाटसरूंवर शेजारील केळीच्या बागेत दबा धरून पाठलाग करून हल्ला करण्याचे प्रकार रोज घडत होते. केसापूर येतील सरपंच बाबासाहेब पवार यांचा मुलगा तेजस पवार हे मित्र मयूर भगत यांच्यासोबत मंगळवारी (दि. १०) रात्री ०८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून केसापूर येथे घराकडे परतत असताना पुजारी यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पाठलाग करून हल्ला केला होता. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात तेजस पवार यांच्या डाव्या पायाच्या पोरीवर बिबट्याच्या धारदार नख्यांनी ओरखडे बसून तेजस गंभीर जखमी झाला होता.
याकामी केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार यांनी वन विभागाशी सातत्याने संपर्कात राहून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. वन विभागाने कार्यवाही न केल्यास श्रीरामपूर-राहुरी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची वन विभागाने दखल घेत रविवारी दुपारी पिंजरा लावला होता. त्यामुळे पवार व ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत