राहुरी/वेबटीम:- महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेकडो कृषी अभियंता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पंधरा दिवस उलटूनही कोणताही निर्णय होत नसल्य...
राहुरी/वेबटीम:-
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शेकडो कृषी अभियंता विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पंधरा दिवस उलटूनही कोणताही निर्णय होत नसल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. १० तारखेपासून आंदोलक आता आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली असून महाराष्ट्र राज्यातील कृषि अभियांत्रिकी पदवीचे विद्यार्थी २५ जानेवारी २०२३ पासून चारही कृषि विद्यापीठात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असल्याचे निवेदन विद्यार्थ्यांच्यावतीने डॉ. विजय मकासरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमोर कृषी अभियंता आंदोलकांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. कृषी अभियंत्यावर अन्याय करणारा अभ्यासक्रम परिक्षेसाठी नियोजित करण्यात आला आहे. या निर्णयाने हजारो कृषी अभियंत्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षेला कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करण्यात यावा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२१ आणि घेण्यात येणारी महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ ला तात्काळ स्थगिती द्यावी. स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी संचालनालय महाराष्ट्र राज्यासाठी स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पात्र करून कृषि अभियंत्यांची तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला कृषि अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय इतर शाखेप्रमाणेच समाविष्ट करण्यात यावा, अशा विविध मागण्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कृषि अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांची सहानुभूतीपूर्वक आणि न्यायपूर्ण भूमिकेतून विचार करून कृषि अभियंत्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना विद्यार्थ्यांच्या वतीने डॉ. विजय मकासरे यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत