डॉ.तनपुरे साखर कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.तनपुरे साखर कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती !

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्याची कामधेनु असलेल्या  डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्याची कामधेनु असलेल्या  डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी काढले असता त्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी   कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे यांच्याकडून पदभार घेण्याची प्रकिया दुपारपर्यंत सुरू होती.


मुख्य प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री गणेश पुरी( जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर) तर प्राधिकृत अधिकारी म्हणून  देविदास घोडेचोर, (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड), तर प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रकाश सैंदाणे,(उपलेखा परिक्षक, सहकारी संस्था अधिन विलेप वर्ग-२ (पणन) अहमदनगर)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आज पदभार घेतल्यापासून पूढील बारा महिन्याच्या कालावधीसाठी प्राधिकृत अधिकारी तनपुरे कारखान्याचे कामकाज बघणार आहे.



डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला आहे. तनपुरे सहकारी साखर  कारखान्याची निवडणुक प्रक्रीया सुरु करावयाची असल्याने निवडणुकीसाठी आवश्यक असणारा निवडणुक निधी रु. ३२,००,०००/- (रु. बत्तीस लाख) राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे या निवडणुक निधी खात्यात निधीचा भरणा करणेबाबत कळविण्यात आले आहे.

 

मात्र "कारखान्याची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे, कारखान्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जाचे हप्ते वेळेवर न दिल्यामुळे बँकेने सरफेशी कायदयान्वये कारखान्याचा ताबा घेवुन कारखाना सिल केलेला आहे. कारखान्याचे कामकाज पुर्णपणे ठप्प आहे. कारखान्याचे केंद्रिय कार्यालय व कारखान्याचे मेन बिल्डींगला कुलुप लावलेले आहे व बँकेची सुरक्षा रक्षक यंत्रणा तेथे तैनात आहे. कारखान्याचे कोणीही कामगार कामावर नाहीत. कारखान्याकडे कोणताही निधी उपलब्ध नाही.


 सिझन २०२१-२२ चे ऊस पुरवठादार शेतक-यांचे अजून पेमेंट देणे बाकी आहे. इतर व्यापारी बँकांची देणी देणे बाकी आहे. कारखान्याची संलग्न संस्था श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडे कोणताही निधी उपलब्ध नाही, शिक्षण संस्थेमधील कामगारांची देणी देण्याकरीता जमीन विक्रीचा प्रस्ताव चालू आहे. कारखान्याकडे कोणताही निधी उपलब्ध नसल्यामुळे निवडणुक खर्चाकरीता रक्कम कारखान्याकडे उपलब्ध नाही" असे कळविले आहे. त्यामुळे कारखान्याने निवडणुकीसाठी आवश्यक तो निवडणुक निधी भरणा करण्यास असमर्थता दर्शविल्याने जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी यांना निवडणुक निधी अभावी सदर कारखान्याची निवडणूक पार पाडता येत नाही. 


 कोणत्याही संस्थेच्या समितीचा किंवा तिच्या कोणत्याही सदस्याचा पदावधी संपला म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक घेण्यात आली व त्या वेळी रिकाम्या जागा भरण्यासाठी आवश्यक असलेले सर्व किंवा कोणतेही सदस्य निवडण्यात कसूर झाली आहे;" आणि दुस-या परंतुकानुसार "सदर प्रकरणी त्वरीत कारवाई करणे आवश्यक आहे अशी निबंधकाची खात्री झाल्यास अशा परिस्थितीत निबंधकास कोणत्याही प्रकारची नोटीस बजावणे आवश्यक नाही" अशी तरतुद आहे.


तर निबंधकास स्वाधिकाराव्दारे किंवा संस्थेच्या कोणत्याही अधिका-याच्या अर्जावरुन आदेशाव्दारे सहकार कायदा कलम ७७(१)(ब)(ii) नुसार एक किंवा अधिक प्राधिकृत अधिका-याची नेमणूक करता येईल व कायदा कलम ७७-ऑ(३) नुसार सदर नेमणूक पदभार घेतल्यापासून १२ महिनेसाठी असेल अशी तरतुद आहे.


तसेच ज्याअर्थी, कायदा कलम ७७-अ (२) नुसार, अशा प्रकारे नेमण्यात आलेल्या प्राधिकृत अधिका-यास निबंधकाच्या नियंत्रणास आणि तो वेळोवेळी देईल, अशा अनुदेशास अधीन राहून समितीची सर्व किंवा कोणतीही कामे किंवा संस्थेच्या कोणत्याही अधिका-याची कामे पार पाडण्याचा आणि संस्थेच्या हितासाठी आवश्यक असेल अशी कोणतीही कार्यवाही करण्याचा अधिकार असेल, अशीही तरतूद आहे.



त्याअर्थी, वरील सर्व परिस्थितीचा विचार करता, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. श्रीशिवाजीनगर ता. राहुरी जि. अहमदनगर यांनी सहकार कायदयान्वये अनिवार्य असणारी निवडणुक प्रक्रीया राबविणेबाबत आवश्यक तो निवडणुक निधी भरणे बंधनकारक असतांना असा निधी भरण्यास कारखाना अपयशी ठरला आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर हे कारखान्याची पूढील निवडणुक प्रक्रीया राबवू शकत नाहीत. तसेच  निवडणुक प्राधिकरणाकडील आदेशानुसार उक्त कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रीया पार पाडता येत नाही. त्यामुळे सहकार कायदा कलम ७७-म (१) (4) (ii) मधील तरतुदीनुसार कारखान्यावर प्राधिकृत अधिकारी नियुक्तीबाबतचे आदेश साखर आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी काढले आहे.त्यानुसार मुख्य प्राधिकृत अधिकारी म्हणून श्री गणेश पुरी, प्राधिकृत अधिकारी देविदास घोडेचोर, तर प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रकाश सैंदाणे हे पदभार स्विकारण्यासाठी दाखल झाले होते.त्यानुसार दुपारपर्यंत ही प्रकिया सुरू होती.

 

४ वाजता संचालक मंडळांची पत्रकार परिषद

 आज मंगळवारी ४ वाजता तनपुरे कारखाना संचालक मंडळाची पत्रकार परिषद दरम्यान तनपुरे कारखान्यावर प्राधिकृत अधिकाऱ्यांची  नियुक्ती करण्यात आली असल्याने राहुरी येथील मुळा प्रवरा कार्यालयात तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढुस व संचालक पत्रकार परिषदेद्वारे संवाद साधणार आहे. या पत्रकार परिषदेत संचालक मंडळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत