अहिल्यानगर(चैताली हारदे) महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह...
अहिल्यानगर(चैताली हारदे)
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्याला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जिल्हास्तरावर अद्यावत अशा उमेद मॉलची उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ची उभारणी करण्यात यावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही ते म्हणाले.
शहरातील तांबटकर मळा येथे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननोन्नती अभियान (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय साईज्योती सरस २०२५ महिला बचतगट निर्मित खाद्यपदार्थ व वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.
बचतगटांसाठीच्या अभिनव उपक्रमाच्या आयोजनाचा जिल्ह्याला पहिल्यांदाच मान मिळाल्याचा मनस्वी आनंद व्यक्त करत पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशाच्या विकासातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.महिलांमध्ये असलेली उद्यमशिलता, क्रियाशक्तीला अशा प्रकारच्या उपक्रमांची साथ दिल्यास निश्चितच महिलांमध्ये अधिक प्रमाणात उर्जाशक्ती निर्माण होऊन देशाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी राज्यभरात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात चार लाख महिला या बचतगटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची वर्गवारी करण्यात येऊन त्या पद्धतीचे मार्केटींग तयार करण्यात यावे. ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीमध्ये एक मोठे परिवर्तन येणार आहे. उत्पादित मालाची ऑनलाईन विक्रीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही अधिक व्यापक स्वरुपात होण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येत असून माझी-लाडकी बहिण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ लाख महिलांच्या खात्यावर १२० कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचेही ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येरेकर म्हणाले, जिल्ह्यात उमेद अभियान ही एक लोकचळवळ बनत चालली आहे. ४ लक्ष महिलांचा अभियानात समावेश करून घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण १ हजार १७४ महिला ग्रामसंघ तयार झालेले असून त्यापैकी ७५५ ग्रामसंघांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध करून देणारा अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. महिलांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद स्मार्ट वेबपोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. याद्वारे जिल्ह्यातील ६१ उत्पादने ऑनलाइन विक्रीस उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले. सन २०२४-२२५ या वर्षात ७३ हजार ९०९ महिला लखपती दीदी झाल्या असून येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक महिलांना अभियान व बँकांच्या कर्ज मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन लखपती दीदी बनवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रदर्शनाला अहिल्यानगरकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रामीण महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.
कार्यक्रमात विविध बचतगटांना कर्ज, बँकींग सर्व्हीस मशिन तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मान्यता प्रमाणपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच लखपती दीदीअंतर्गत महिलांचा सन्मानही करण्यात आला.
पालकमंत्र्यांकडून स्टॉलची पहाणी
विभागीय साईज्योती सरस २०२५ प्रदर्शनात विभागातील पाचही जिल्ह्यातून आलेल्या बचतगटांच्या स्टॉलला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देऊन उत्पादित केलेल्या मालाची पहाणी करत महिलांशी संवादही साधला.
२० मार्चपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार
नाशिक विभागातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण ३२५ बचतगट या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनामध्ये वस्तू विभाग दालनामधे विविध वस्तूंचे १२० स्टॉल उपलब्ध असून यातून २४० बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच खाद्य विभागाच्या दालनामध्ये ८५ बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट अशा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थांचे स्टॉल उपलब्ध आहेत. पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी असणार असुन २० मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत